102 रुग्ण वाहिनीच्या चालकांची उपासमार

सहा महिने वेतनाविना
ठेकेदार करताहेत चालकांचा शोषण

। मुरुड । वार्ताहर ।

ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत उपचार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात 102 नंबरच्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यांच्यावरील चालकांचे वेतन अदा करणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु राज्य शासन मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले वाहनचालकांना कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती करुन ठेकेदारामार्फत त्यांना वेतन दिले जात आहे. हे ठेकेदार या चालकांची फसवणूक करुन शासनाने ठरवलेल्या वेतनातून अर्धे वेतन चालकांना देऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण करीत आहेत. तसेच सहा सहा महिने वेतन देत नसल्याने चालकांची उपासमार होत आहे. या एप्रिल महिन्यात सहा महिन्याने चालकांना फक्त एकच महिन्याचे वेतन देण्यात आले आहे.

चालकांना मागील 5-6 महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा, हा प्रश्‍न येथे निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका गाडीचा उपयोग आरटीपीसीआर सॅम्पल जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, व्हॅक्सिन आणणे, औषधे आणणे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनेशन सेंटरवर व्हॅक्सिनची ने-आण व्हॅक्सिनची ने-आण करणे, गरोदर महिला रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालय मध्ये पोहचवणे, गरोदर, प्रसुती मातांना घरी नेण्यासाठी आदी स्वरूपाची सेवा येथील चालक 24 तास अविरत करीत असतात.

आधीचे ठेकेदार अ‍ॅशकॉम या कंपनीकडून येथील चालकांचा पगार दिला जात होता. त्या काळात सहा महिन्यांचे वेतन चालकांना मिळाले नाही. 1 एप्रिल 2022 पासून नविन ठेकेदार गरुड झेप सातारा कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. तर आधीच्या कंपनीने ऑक्टोबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत सहा महिन्यांत वेतन न दिल्याने उपासमारीची वेळ या 102 रुग्ण वाहिनीच्या चालकांवर आली आहे. याच एप्रिल महिन्यात फक्त एक महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. जर हे कंत्राटदार अशा पद्धतीने चालकांचे शोषण करीत असतील व सहा सहा महिने वेतन देत नसतील तर ठेकेदार नेमता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वेतन दिले जावे अशी मागणी चालक करीत आहेत.

Exit mobile version