‌‘108′ ठरली जीवनदायिनी; लाखो रुग्णांना मिळाले वेळेत उपचार

वर्षभरात 3,201 बाळांचा रुग्णवाहिकेत जन्म

। रायगड । आविष्कार देसाई ।

आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी 108 रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 73 हजार 645 रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यात यश आल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले आहेत. तसेच, प्रसूतीसाठी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना याच रुग्णवाहिकेमध्ये तब्बल 3,201 बाळांचा जन्म झाला आहे. त्यामुळे आई आणि बाळांसाठी हीच रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे.

जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या एका वर्षात रायगड जिल्ह्यातील 1 लाख 73 हजार 645 रुग्णांना महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या 108 रुग्णवाहिकेने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. अपघातात जखमी झालेले रुग्ण, आगीसारख्या घटनांमध्ये भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, उंचावरून पडून जखमी झालेले, विषबाधा झालेले, एखाद्या आपत्तीत झालेली सामूहिक इजा, गर्भवती महिला, आत्महत्येसारखा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अशा अनेकांना या सेवेचा उपयोग झाला आहे. 108 रुग्णवाहिका अद्ययावत असल्याने रुग्णांना अतिदक्षता विभागातील उपचारही याच रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

अपघातमध्ये जखमी झालेल्या 8 हजार 518 जखमींना उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांडण तंटे किंवा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 1,104 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 853 भाजलेल्या रुग्णांना ‘108’ ने रुग्णालयात दाखल केले आहे. हृदयाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या 1,543 रुग्णांना तातडीने उपचार करण्यासाठी ‘108’ ची मदत झाली आहे. खाली पडल्याने जखमी झालेल्या 4,359 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या 4,490 बाधितांना उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले आहे. प्रसूतीसाठी 24,033 महिलांना मदत झाली आहे. मोठ्या संख्येने जखमी झालेल्या 553 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात ‘108’ रुग्णवाहिकेला यश आले आहे. विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या 100, वैद्यकीय उपचासाठी एक लाख 12 हजार 081, इतर आजारांच्या उपचारासाठी 13 हजार 669 आणि पॉली ट्रामाच्या 3432 आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 120 नागरिकांना अधिक उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेने त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे.

'108' मोफत मदत क्रमांक
महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात ‌‘108' च्या 23 रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शहरी आणि दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार देणे आणि रुग्णालयापर्यंत पोहोचवणे अशा दोन प्रकारचे काम रुग्णवाहिकेमार्फत केले जाते. 108 हा क्रमांक मोफत मदत क्रमांक असल्यामुळे कोणीही त्यावर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करू शकतो.
रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते?
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‌‘108' रुग्णवाहिका' सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. '108' या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून रुग्णवाहिका मिळवणे शक्य आहे. '108' च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी कालावधीत प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही '108' मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

108 रुग्णवाहिका मोफत सेवा देते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सदरची सेवा रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात यशस्वी ठरत असल्याने ती जीवनदायिनी ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही सेवा अतिशय चांगली आहे.

कांचन बिडवई, उपजिल्हा व्यवस्थापक, रायगड
Exit mobile version