49 केंद्रांमध्ये 31 हजार 943 विद्यार्थी बसणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारी एक मार्चपासून सुरु होणार आहे. एकूण 74 केंद्रांमध्ये 37 हजार 277 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेस बसणार आहेत. ही परीक्षा 26 मार्चपर्यंत असणार आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणतीही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत.
पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मराठी विषयाचा पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. परीक्षा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर उत्कंठा संपली आहे. एक मार्चपासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. आपले आसन क्रमांक पाहण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली.
परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी बैठे पथक, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक परिरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.