भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून विधानसभेत घमासान
। मुंबई । दिलीप जाधव ।
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आज विधानसभेत घमासान झालं. भाजप-शिवसेनेचे आमदार परस्परांशी भिडले तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला.

भाजपचे आमदार अ‍ॅड.आशिष शेलार, गिरीश महाजन, डॉ.संजय कुटे, हरीश पिंपळे, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, राम सातपुते, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, किर्तीकुमार भांगडीया, योगेश सागर या 12 आमदारांना सभागृहात तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणे, अध्यक्षांना अर्वाच्य भाषेत बोलणे आदी गैरवर्तनाच्या कारणांमुळे पुढील एक वर्षाकरिता निलंबन करीत असल्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत मांडला व तो बहुमताने मंजूर करण्यात आला.

या निलंबनाच्या कालावधीत निलंबित आमदारांना मुंबई व नागपूर येथील विधानभवनाच्या परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा द्यावा, असा ठराव मांडला आणि तो बहुमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी सभागृहात भाजपच्या आमदारांनी ठाकरे सरकार ओबीसी समाजाची कशी दिशाभूल करते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भाजपचे आमदार आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक घडली. सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे काही आमदार तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आसनाजवळ येऊन आम्हाला बोलू द्या, असं म्हणत आक्रमक झाले. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं व ते प्रभारी अध्यक्षांच्या दालनात गेले.

भाजपच्या संतप्त आमदारांनी धक्काबुक्की केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. माईक खेचून तोडले. विरोधक गावगुंडासारखे तुटून पडले. राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आज घडली. तुम्ही तालिका अध्यक्षांच्या खुर्चीचा मान राखला पाहिजे. माझे कोकणी मित्र आशिष शेलार यांनी झाल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली; पण लाथ मारायची आणि पाया पडायचे हे योग्य नाही.

भास्कर जाधव, तालिका अध्यक्ष

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या ठरावावर आमच्या आमदारांना बोलू दिले नाही. आमच्या कुठल्याही आमदाराने शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची सभागृहात झाल्या प्रकाराबद्दल आशिष शेलार यांनी स्वतः माफी मागितली होती. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारकडून एक स्टोरी तयार करण्यात आली आणि आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले; मात्र ओबीसी समाजासाठी 12 काय आमचे 106 आमदार निलंबित केले तरी ओबीसी आणि मराठा समाजासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. मुख्य म्हणजे 2022 सालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यायचे नाही .ही ठाकरे सरकारची रणनीती आहे.

आ. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Exit mobile version