। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानच्या डोंगर रांगेत असलेला पेब किल्ला अर्थात विकटगड येथे डोंबिवली येथील 12 ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. सायंकाळी परत येताना पावसाळ्यात कोसळलेल्या दरडीमुळे ते रस्ता भरकटले आणि तीन तासानंतर त्यांना माथेरान घाटरस्त्यात आणले गेले. माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्न्यू टीमने पाऊस सुरू असताना अंधार्या रात्रीत शोध घेत ही मोहीम यशस्वी केली.
डोंबिवली येथील 12 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी पेब किल्ल्यावर आला होता. सकाळी नेरळ येथील फणसवाडी येथून किल्ल्यावर पोहचल्यावर येताना मिनिट्रेनच्या ट्रॅकने परतत असताना अंधार पडला होता. साडेसातच्या सुमारास मोबाईलमधील बॅटरीच्या उजेडात चालत असताना रेल्वे मार्गात कोसळलेल्या प्रचंड दरडीमुळे समोर जाण्याचा रस्ता बंद झाल्याने हे तरुण घाबरून गेले. 9 तरुणी 3 तरुण असे एकुण 12 जण रस्ता चुकल्याने घाबरलेल्या अवस्थेत कर्जत आणि माथेरान पोलिसांशी संपर्क करू लागले. ही माहिती माथेरान पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी सह्याद्री रेस्क्यू टीमला माहिती दिली आणि पोलिसांसोबत ही टीम मिनिट्रेन ट्रॅकच्या मार्गाने त्या ट्रेकर्सना शोधण्यासाठी निघाली.
माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, चेतन कळंबे, सुनिल ढोले, महेश काळे, दिनेश सुतार हे दरड कोसळलेला रेल्वे मार्ग शोधत निघाले. चिखलातुन तसेच मोठमोठ्या दगडांवरून मार्ग काढत या रस्ता चुकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचले. हे सर्व तरुण अनपेक्षित घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झाले होते. माथेरान पोलिसांनी रेस्क्यू टिमच्या मदतीने अखेर अडकलेल्या 12 जणांच्या ग्रुपला जवळपास रात्री 10 वाजताच्या सुमारास माथेरान घाट रस्त्यात सुखरूप आणले.
पेब किल्ल्यावर गवत मोठ्या प्रमाणावर वाढले असून ट्रेकर्स नी स्थानिक आदिवासी तरुण यांना सोबत घेऊन किल्ला पहावा.त्याचवेळी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असे कोणतेही कृत्य करू नये.
वैभव नाईक-सह्याद्री रेस्क्यू टीम