कल्याण परिमंडलात १२७ कोटींची थकबाकी

| कल्याण | वार्ताहर |
महावितरणच्या कल्याण परिमंडलात आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवसांचा कालावधी उरला असतानाही वीज ग्राहकांकडे (कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) 127 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे थकित रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचार्‍यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचार्‍यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वाढत्या तापमानातही वसुलीच्या कामात व्यग्र आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील तीन लाख 31 हजार 275 ग्राहकांकडे 100 कोटी 33 लाख आणि तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या 48 हजार 225 ग्राहकांकडे 27 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. कल्याण पूर्व आणि पाश्‍चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत 68 हजार 350 ग्राहकांकडे 9 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत 1 लाख 14 हजार 547 ग्राहकांकडे 68 कोटी 53 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील एक लाख 26 हजार 705 ग्राहकांकडे 20 कोटी 63 लाख तर पालघर मंडलातील 69 हजार 898 ग्राहकांकडे 28 कोटी 85 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल प, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version