जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 127 घरांची पडझड; एकाचा मृत्यू, 597 कुटुंबे स्थलांतरित

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
मागील आठवड्यात पाली सुधागड़सह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. जिल्ह्यात विविध ठीकठिकाणी 127 घरांची पडझड झाली आहे. तर यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. प्रशासनाने खबरदारी घेत तब्बल 597 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. दरवर्षी महापुर व अतिवृष्टी यामध्ये होणारी जिवितहानी व वित्तहानी चिंता वाढवणारी आहे. याबरोबरच पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली अंबा नदी पुलावरून सलग तीन ते चार वेळा पाणी गेल्यामुळे येथील वाहतूक कित्येक तास कोळंबली होती. याच मार्गावर तकसई गावाकडे जाणारा पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी प्रवासी व वाहन चालक यांची खूप गैरसोय झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मंगळवार (ता.19) नैसर्गिक आपत्ती दैनंदिन अहवालातील माहितीनुसार जिल्ह्यात पूर्णतः पडलेली घरे 18 आहेत. यातील पक्की घरे एकूण 7 आहेत. त्यामध्ये मुरुड आदिवासी वाडी 1, अलिबाग 1 खानाव, पेण 2 त्यामध्ये मंगोशी प्रधानवाडी व पाडले, माणगाव 1 साई, रोहा 1 तामसोली, खालापूर 1 वांगणी येथे पुर्णतः पडलेली कच्ची घरे एकूण 11 त्यामध्ये पोलादपूर 1 वडविहीर-चिंचखांबाला, खालापूर 2 चोपडा व टेंभरी, महाड 2 हिरकणीवाडी व कोंझर, माणगाव 2 माकटी व निजामपूर, पनवेल 1 मोठी धामणी, उरण 1 जांभूळपाडा आदिवासीवाडी आणि रोहा 2 खारखर्डी.तर अंशतः पडलेली घरे एकूण 109 असून यामध्ये पक्की घरे 51 तर कच्ची घरे 58 आहेत. पडझड झालेल्या झोपड्यांची संख्या 13 असून यामध्ये अंशतः पडझड झालेल्या झोपड्या 8 व पूर्णतः पडझड झालेल्या झोपड्या 5 आहेत. उरण जांभूळपाडा आदिवासी वाडी येथे घर पडून एकाचा मृत्यू तर पेण तालुक्यातील पाडले येथे एक व्यक्ती जखमी झाला.अंशतः पडलेल्या पोल्ट्री शेड 2 आहेत. 15 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version