राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या 13 खेळाडूंची निवड

| रायगड | प्रतिनिधी |

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे दिनांक 14 ते 17 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट ज्युनिअर ॲथलेटिक्स मीट या राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या 13 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच तीन खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2026 रोजी एचओसी इंटरनॅशनल स्कूल, रसायनी येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीतील खेळाडूंच्या कामगिरीचे परीक्षण करून निवड समितीने विविध वयोगटांतील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली.

14 वर्षांखालील मुलांमध्ये अनय पाटील ट्रायथलॉन अ, चिराग म्हात्रे ट्रायथलॉन ब, 14 वर्षांखालील मुलींमध्ये शांभवी सिंग ट्रायथलॉन अ, किया वैद्य ट्रायथलॉन ब, 16 वर्षांखालील मुलांमध्ये रितिंकुमार जेना 60 मीटर धावणे, अनस खान लांब उडी, छत्रपती कटुळे गोळाफेक, रुपेश कांबटी उंच उडी, ईशान डे 600 मीटर धावणे, 16 वर्षांखालील मुलींमध्ये सारा घोड 60 मीटर धावणे, श्रेया बांदल 80 मीटर अडथळा धावणे, भावी राणा लांब उडी, सान्वी भोसले गोळाफेक, राखीव खेळाडूंमध्ये मिहिका सिंग 600 मीटर धावणे, मानसी ठाकूर लांब उडी आणि प्राची खानावकर भालाफेक या खेळाडूंची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष नितीन कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत समिती सदस्य यतिराज पाटील, कादिरवहन नाडर आणि व्ही. एम. श्रीलक्ष्मी श्रीकुमारन यांनी सहभाग घेतला. निवड झालेल्या खेळाडूंची अधिकृत यादी, प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.या राष्ट्रीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version