| पनवेल | वार्ताहर |
सोनाराला स्वस्तात सोने देतो असे सांगून त्याला 13 लाखाला लुटल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे. सोनार रवींद्र चौधरी यांना राज नावाच्या व्यक्तीने रवींद्र यांचे मित्र सुनील इंगळे यांना स्वस्तात सोने देतो असे सांगून गळाला लावले होते. त्यानुसार इंगळे यांनी रवींद्र यांनाही स्वस्तातील सोन्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार रवींद्र चौधरी, सुनील इंगळे, रतनसिंग राठोड व इतर एकजण कारने खारघरला आले. त्या ठिकाणी कारमधून आलेल्या पाच व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून पैशाची बॅग घेऊन थांबलेल्या रतनसिंह राठोड यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. चौधरी व राठोड यांचा संपर्क झाला असता आपल्याला लुटले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.