कोकणातील 105 महसुली गावांचा समावेश, पर्यावरणाची हानी, सामान्यांसाठी विकासाची नुसती स्वप्न
| रायगड | खास प्रतिनिधी |
कोकण किनारपट्टीवरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोकण द्रुतगती मार्ग, महामार्गालगत 13 नवेनगरच्या 449.83 चौ.कि.मी क्षेत्राकरिता एमएसआरडीसीची (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये चार जिल्ह्यांतील 105 महसुली गावांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प येथे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, शिवाय यातून सामान्यांचा कोणता विकास साधला जाणार आहे, असे सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
मुंबई, ठाणे या महानगरांच्या विकासानंतर आता सरकारने नवीन महानगरे, नवेनगर वसवण्याचा चंग बांधला आहे. किनारपट्टीवरील गावांचा विकास साधण्याची तयारी सरकारने केली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण किनारपट्टीवरील जिल्हे आहेत.
नवेनगरचा विकास करण्याची धुरा याआधी सिडकोकडे देण्यात आली होती. 15 मार्च 2024 च्या अधिसूचनेनुसार नगर विकास विभागाने ती रद्द केली आहे. आता ही जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपवली आहे. विकास क्षेत्राची योजना आखणे, विकास क्षेत्राची योजना तयार करण्याचे काम या संस्थेकडे आले आहे. कामकाजाकरिता नगर रचना व मूल्यनिर्धारणासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची 41 पदे प्रतिनियुक्तीने एमएसआरडीसीमध्ये भरण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील 37 गावे, रत्नागिरी जिल्ह्यातील 35 गावे, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांतील अनुक्रमे 19 आणि 14 गावांचा समावेश आहे. एकूण 449.83 चौ.कि.मी. क्षेत्राचा समावेश आहे.
13 ग्रोथ सेंटर कोणती
रायगड जिल्ह्यातील दिघी (26.94 चौ.किमी), माजगाव (47.07 चौ. किमी), न्हावे (21.98 चौ.किमी) आणि रोहा (24.82 चौ.किमी)
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोळगड (50.05 चौ.किमी), देवके (25.42 चौ.किमी), नवीन गणपतीपुळे ( 59.28 चौ.किमी), दोडावण (38.67 चौ.किमी), केळवा (48.22 चौ.किमी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (19.75 चौ. किमी), नवीन देवगड (41.66 चौ.किमी), रेडी (12.09 चौ.किमी)
पालघर जिल्ह्यातील वाधवण (33.88 चौ.किमी)
कोकणचा विकास करताना तेथील सामान्य माणसाला विश्वासात घेतले जात नाही. ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प येथे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे. विकास झाला पाहिजे, मात्र तो शाश्वत आणि सर्वसमावेशक असला पाहिजे. मूठभर लोकांचा विकास होऊन गरीब-श्रीमंतातील दरी वाढत जाणार आहे. चार अधिकारी आणि काही सत्ताधारी बसून कोकणचा विकास कसा काय साधू शकतात.
दिलीप जोग, सामाजिक कार्यकर्ते