। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात गोवरची साथ फैलावू नये म्हणून बालकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्हास्तरावर 2 हजार 80 डोस, तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर 22 हजार 150 गोवर रुबेला लससाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात जानेवारी 2022 पासून खालापूर तालुक्यात 6 रुग्ण, पनवेल 2 रुग्ण, उरण 6 रुग्ण असे एकूण 14 रुग्ण आढळले आहेत. तसेच 1 एप्रिल 2022 पासून 123 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 14 बालके गोवर पॉझिटिव्ह आली आहेत.
यावर्षी रायगड जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली असून, ज्या भागात या रुग्णांची नोंद झाली आहे, त्या भागात गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात आली आहे. तसेच या बालकांसाठी विशेष व नियमित सत्रामध्ये लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर 2 हजार 80 डोस, तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर 22 हजार 150 गोवर रुबेला लससाठा उपलब्ध आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेताना गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासंदर्भात टास्क फोर्स सभा घेण्याची सूचना व्ही.सी. व्दारे दिली होती. त्यानुसार दि.2 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र रोकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गोवर उद्रेक व उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकार्यांना सार्वजनिक विभागाव्यतिरिक्त सर्व शासकीय विभागांकडून मदत घेण्यात यावी, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग सर्वेक्षणात मदत घ्यावी, आयएमए, निमा, आयएपी यासारख्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडूनही मदत घ्यावी, लसीकरण जनजागृती आपल्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे करावी, लसीकरण व सर्वेक्षण कृती आराखडे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये तयार करण्यात यावे, ताप, पुरळ रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण करण्यात यावे, जिल्ह्यातील गोवर हॉटस्पॉटचा शोध घेऊन स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.
सध्या रायगड जिल्ह्यामध्ये गोवर प्रभावित भागामध्ये एकूण 26 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. 10 हजार 962 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 14 हजार 92 बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच 12 हजार 757 बालकांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या सुरु असणार्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना यापूर्वी लस दिली नसल्यास तात्काळ या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे. गोवर रुबेला लस सर्व शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.
नागरिकांनी घाबरु नये, कोणत्याही परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे सज्ज असून, जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सर्व प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी केले आहे.
नागरिकांनी घाबरु नये, कोणत्याही परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे सज्ज असून, जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सर्व प्रकारे सहकार्य करावे.
महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी