| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमध्ये मंगळवारी (दि.9) रात्री एका खासगी कंपनीची बस 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर-दुर्ग मार्गावर रात्री उशिरा हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या दरीत पडलेल्या बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. या बसमध्ये खासगी कंपनीचे सुमारे 40 कर्मचारी प्रवास करत होते. या भीषण बस अपघातात 16 जण जखमी झाले असून काही गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या अपघातातबाबत शोक व्यक्त केला असून, प्रशासनाला जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.