जिल्ह्यात 14 गावं दरडीच्या छायेखाली

413 कुटूंबातील 1 हजार 555 जणांना स्थलांतरीत होण्याचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दुर्घटनांमध्ये 84 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दरड प्रवण भाग जाहीर केले आहेत. यात महाड तालुक्यातील चार तर पोलादपूर तालुक्यातील 10 असे 14 गावं असून त्यातील 413 कुटूंबातील 1 हजार 555 जणांना जिल्हा प्रशासनाने तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहेे.
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर तालुक्यातील काही गावांमध्ये जमीन मोठ्या भेगा पडल्या असून घरांना तडे गेले आहेत. गावातील काही भाग खचून दरड, माती पसरली आहे. नुकताच घाट माथ्यावर पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे या दरड प्रवण भागातील गावकर्‍यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरड प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये पुढील गावांचा समावेश आहे. महाड तालुक्यातील हिरकणी वाडी, कुटूंब संख्या 15, लोकसंख्या 78, मोहोत सुतारवाडी, कुटूंब संख्या 31 लोकसंख्या 115, मोहोत भिसेवाडी कुटूंब संख्या 25 लोकसंख्या 75, वाघेरी (आदिवासी वाडी) कुटूंब संख्या 45 लोकसंख्या 148. तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी कुटूंब संख्या 40, लोकसंख्या 160, साखर कुटूंब संख्या 20, लोकसंख्या 80, साखर (चव्हाणवाडी) कुटूंब संख्या 24 लोकसंख्या 95, साखर पेढेवाडी कुटूंब संख्या 20, लोकसंख्या 80, केवनाळे कुटुंब संख्या 80, लोकसंख्या 240, दाभीळ कुटूंब संख्या 40, लोकसंख्या 120, चरई कुटूंब संख्या 14, लोकसंख्या 63, माटवण मोहल्ला कुटूंब संख्या 9, लोकसंख्या 40, सवाद कुटूंब संख्या 40, लोकसंख्या 216, कनगुले कुटूंब संख्या 10, लोकसंख्या 45.
महाड व पोलादपूर तालुक्यातील मिळून एकूण कुटूंब संख्या 413 असून लोकसंख्या 1 हजार 555 आहे. प्राथमिक निरीक्षणावरुन या गावांना दरड कोसळण्यापासून धोका असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, राज्य इकाई-महाराष्ट्र तसेच प्रकल्प संचालक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य युनिट, पुणे यांना या गावांचे सर्वेक्षण करुन सविस्तर अहवाल सादर करण्यास कळविले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनास सादर केला जाईल व या गावांमध्ये दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील.

Exit mobile version