महाडमध्ये रुग्णालयासाठी 148 कोटी

। महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यासह लगतच्या गावे-पाड्यांतील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी तसेच अपघातग्रतांनाही तत्काळ उपचार मिळावेत, या दृष्टिने महाड जवळील केंबुर्ली येथे 200 खाटांचे भव्य सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी व आराखड्यासाठी राज्य सरकारने सुमारे 148 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

महाड व पोलादपूर तालुके हे दरडग्रस्त तालुके आहेत. या तालुक्यात वारंवार नैसर्गिक आपत्ती घडतात. महाड येथे औद्योगिक वसाहत आहे तर कोकण रेल्वेचे तसेच घाटमार्गाचे व महामार्गाचे मोठे वाहतूक जाळे आहे. यामुळे येथे अद्ययावत रुग्णालयाची गरज निर्माण झाली होती. महाड तालुक्यात सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांवर मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, म्हसळा हे तालुके अवलंबून आहेत. परंतु त्या तुलनेत आरोग्य सुविधा नाहीत. सद्यःस्थितीत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर असले तरी तेथे कर्मचार्‍यांची वानवा असल्याने मुंबई-पुणे गाठावे लागते. महाड शहरानजिक मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या केंबुर्ली येथील 42 हेक्टर सरकारी जागेत 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. याकरिता राज्य सरकारने इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास 147 कोटी 70 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर महाडकरांना मोठ्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी मुंबई-पुण्यात जाण्याची गरज उरणार नाही. तर अपघातातील गंभीर जखमींनाही तात्काळ उपचार मिळणार असून मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.

Exit mobile version