| पनवेल | प्रतिनिधी |
जवळपास 100 ते 150 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे 250 ते 300 तक्रारदारांना न्याय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेल जवळील सुकापूर विमलवाडी गट नंबर 7 व 8 येथे 60 रूम बांधण्याचे काम शिरीषकुमार रंगराव चव्हाण याने घेतले होते. त्याने सदर ठिकाणी कामाची सुरवात केली होती. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक 1 सदनिका ही 2 ते 3 लोकांना विकून सदर व्यक्तींकडून लाखो रुपये उकळले होते. याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात कृष्णा सहदेव मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांच्या पथकाने तपास सुरु केला. पनवेल न्यायालयातून 2016 साली त्याला जामीन मिळाल्याची माहिती मिळाली. तो गेली 8 वर्षे न्यायालयात हजर राहिला नव्हता. सध्या तो कोल्हापूर परिसरात राहत असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपील ताब्यात घेतले. त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यासह वाशी, कळंबोली ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.