पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील

सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

। पुणे । प्रतिनिधी ।

राज्याचं लक्ष लागलेल्या पवार कुटुंबातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघातील मतदानाची तयारी प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली असून मंगळवारी येथे मतदान आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कडक बंदोबस्त तैनात आहे. मात्र, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची मागणी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रं संवेदनशील असून त्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार होऊ शकतो. त्यामुळे अशा मतदान केंद्रांवर खबरदारीचे उपाय योजण्यात यावेत, अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या संवेदनशील बुथवर काही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असंही त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. सुप्रिया सुळेंकडून इ-मेलच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बारामतीमधील जी मतदान केंद्रं संवेदनशील असल्याचा दावा करण्यात आलाय, त्या मतदान केंद्रांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. यात बारामती शहर- 12, बारामती ग्रामीण- 47, दौंड- 33, पुरंदर- 31, भोर- 31, खडकवासला- 3 ही मतदान केंद्र संवेदनशील असल्याने येथे अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे, तब्बल 157 मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्याची व खबरदारीचा उपाय म्हणून काम करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Exit mobile version