| नागपूर | वृत्तसंस्था |
विजांचा कडकडाट सुरू असताना मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
शिवकुमार फकीरा सयाम (16), महादेवनगर, लाव्हा, वाडी असे मृतकाचे नाव आहे. गुरुवारी (दि.18) दुपारपासूनच परिसरात ढग दाटून आले होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. मात्र त्या स्थितीतदेखील शिवकुमार क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. तो अभिजीत सोसायटीतील टेकडी शिव मंदिरामागील मैदानात क्रिकेट खेळत असताना अचानक वीज तो खेळत असलेल्या ठिकाणीच पडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला घटनास्थळावरील लोकांनी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली उभे राहू नये, मोकळे मैदान किंवा शेतातून सुरक्षित जागी जावे असे आव्हान वारंवार प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते व त्यातूनच प्राणहानीच्या घटना घडतात.