| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
स्व.नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने कॅरमदिन म्हणून रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील जय मंगल हॉल येथे करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 168 कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या खेळाडूंनी पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेसाठी सहभाग घेतला असल्याने स्पर्धेला रंगत येणार आहे. स्पर्धेच्या विजयी व उपविजयी खेळाडूंना झुंझार युवक मंडळाचे माजी अध्यक्ष पै.अन्वर बुराण यांच्या स्मरणार्थ अनुक्रमे रोख रक्कम 7 हजार व 5 हजार रुपये आणि आकर्षक चषक बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. दोन दिवसीय आयोजित कॅरम स्पर्धा पाहण्यासाठी पोयनाड विभागातील कॅरम प्रेमींनी गर्दी केली आहे. या स्पर्धेतील उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे, सचिव दिपक साळवी, कार्याध्यक्ष प्रदीप वाईंगडे, खजिनदार वैभव पेठे, सदस्य पांडुरंग पाटील, झुंझार युवक मंडळचे सचिव किशोर तावडे, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर व ॲड. पंकज पंडित आदी उपस्थित होते.







