| मुंबई | प्रतिनिधी |
वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी (दि.26) मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली. यातील मृतांचा आकडा आता 17 वर पोहोचला असून, शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. इमारतीचा चौथा मजला कोसळताच एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला झाला आणि ढिगाऱ्यांखाली 20 ते 25 जण गाडले गेले.
या अपार्टमेंटमध्ये एकूण 50 फ्लॅट्स आहेत. त्यापैकी अंदाजे 12 फ्लॅट्स कोसळले. दुर्घटनेनंतर अंधेरी येथून एन.डी.आर.एफ.ची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला ढिगारा बाजूला करण्यासाठी जेसीबी पोहचू शकत नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारती आणि बाजूच्या चाळी खाली करून काही भाग तोडल्याने बचाव कार्याला गती मिळाली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घालाअजूनही बचाव कार्य सुरूच असून, लवकरच अन्य अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. कोसळलेल्या ढिगाऱ्याकडे पाहत नातेवाईक आक्रोश करीत होते. यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे वातावरण पसरले. पालघरच्या जिल्ह्याधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दुपारी दुर्घटनास्थळी भेट दिली बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना वसई विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिल्या.







