पेण तालुक्यातील 17 शाळांना लागणार कुलूप

दहा पेक्षा कमी विद्यार्थी असणार्‍या शाळा होणार बंद
। पेण । वार्ताहर ।
दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये समायोजित केले जाणार असले तरी शासनाच्या या निर्णयाचा तालुक्यातील सुमारे 17 शाळांमध्ये कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर व 26 शिक्षकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दूरच्या शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशानुसार रायगड जिल्हयातील अनेक शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 50 च्या वर शाळांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. पेण तालुक्यात वाड्या-वस्त्यांवरील शाळांवर परिणाम होणार असून वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्याची मोठी तारंबळ उडणार आहे. सर्व सामान्यांना शिक्षण मिळणे हा मुलभुत हक्क असताना आज पटसंख्या घसरत असल्याने ग्रामीण भागातील शिक्षकांचा कंबरडा मोडत आहे. याला सर्वस्वी जबाबदार ग्रामीण भागात काम करणारा शिक्षक वर्ग आहे. कारण शासन नियमा नुसार शिक्षकांना मुख्यालयात राहणे सक्तीचे असताना देखील कित्येक शिक्षक हे मुख्यालय सोडून शहरा ठिकाणी राहतात आणि आठवडयातून एक ते दोन दिवसच शाळांमध्ये येत असतात. त्यामुळे कळत न कळत ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्थर घसरत चालल्याने पटसंख्या ही घसरत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु ही पटसंख्या गरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर बेतत आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.

Exit mobile version