| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यात भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचा सूर वाढत चालला आहे. मंगळवारी, (दि.15) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड, सेक्टर-50 येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीच्या 801 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणारे दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे 14 लाख 40 हजारांची मालमत्ता लंपास केली.
या घटनेत विशेष म्हणजे घराचे लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाट उघडून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दागिने चोरी केले. चोरी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र नेहमीप्रमाणे पुढील तपास सुरू आहे. या औपचारिक वाक्यापलीकडे काहीच घडलेले नाही. दीपराज ठाकूर हे सीव्ही प्रा. लि. कंपनीत कार्यरत असून, त्यांची पत्नी पूनम ठाकूर या उरण एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षिका आहेत. दोघेही कामावर व मुलगा शाळेत गेल्यानंतर घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली.







