। सांगोला । प्रतिनिधी ।
सांगोल्यातील जवळा येथे आलेल्या जोरदार वावटळीत झोपडीतील पाळणा सुमारे 20 फूट हवेत उडून गेल्याने पाळण्यातील 2 वर्षीय मुलीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.27) घडली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साधू अण्णाप्पा चव्हाण (रा. सोनंद ता. सांगोला) यांनी दिलेल्या माहितीनूसार कस्तुरी साधू चव्हाण (वय 2) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे.
साधू चव्हाण यांची सासरवाडी जवळा येथील असून, गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास साधू चव्हाण व पत्नी अनिता हे मुलगी कस्तुरी हिस सोबत घेवून जवळा येथे तिचे सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करायचे असल्यामुळे आले होते. मुलगी कस्तुरी हिस पत्नी अनिता यांनी सासरे वामन निंबाळकर यांच्या राहत्या झोपडीवर नातेवाईकांसोबत ठेवले होते. मुलगी कस्तुरी झोपी गेल्यामुळे झोपडीस बांधलेल्या झोळीमध्ये तिला झोपवले होते.
दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठी वावटळ आल्याने त्यामध्ये झोपडीसह मुलगी कस्तुरी झोपलेली झोळी अंदाजे 20 फूट उंचीवर उडून कस्तुरी दगडावर पाठीमागील बाजूस आपटली. त्यामध्ये कस्तुरी गंभीर जखमी झाल्यामुळे नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचाराकरीता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.