मासेमारीची उलाढाल 200 कोटींवर

| रत्नागिरी | वृत्‍तसंस्था |

परराज्यातील स्पीडबोटींचे अतिक्रमण, विजेच्या प्रखर झोताच्या साह्याने मासेमारी, इंधनाचे वाढते दर आणि जोडीला अपेक्षीत मासळी न मिळाल्याने यावर्षीचा मत्स्यव्यावसाय ‘ना नफा ना तोटा’ असाच राहीला आहे. 1 जूनपासून हंगाम संपुष्टात आला असल्यामुळे नौका बंदरात स्थिरावल्या आहेत. वर्षभरात होणारी सुमारे 300 कोटींची उलाढाल यंदा 200 कोटींवर आल्याचे मच्छीमारांचे मत आहे.

यंदाच्या मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर मोठी वादळे कोकण किनारपट्टीवर आली नसली तरीही अधूनमधून वातावरणातील बदलांमुळे वेगवान वाऱ्यांचा अडथळा होताच. त्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 10 वेळा मासेमारी बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्याचा फटका मच्छीमारांना बसला. पाच वर्षांनतर यंदा तार्ली मासा मोठ्या प्रमाणात मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला. तर बांगडा मासा मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक सापडला. तर सुरमई, शिंगाडा, पापलेट या माशांची वानवा यंदाही होतीच. अपेक्षेपेक्षा कमी मासा मिळाल्याने त्याचा परिणाम मच्छीमारांच्या उलाढालीवर झाला. दहा महिन्यांच्या हंगामात पर्ससिनेट मासेमारी 4 महिने होती. त्यातील 50 टक्केच दिवस मासे हाती आले. तर उर्वरित दिवस वाया गेले. या कालावधीत मच्छीमारांना रिकाम्या हाती परतावे लागले.

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे हे जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर आहे. या बंदरात दरदिवशी कोट्यावधींची उलाढाल होते. या ठिकाणी सुमारे 25 पर्ससिनेट, 150 ते 200 फिशिंग ट्रॉलर, 100 यांत्रिक होड्या, सुमारे 50 बिगर यांत्रिक होड्या अशा मिळून 300 हून अधिक मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. तारली, शिंगाळा, सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांना स्थानिक बाजारपेठेत परदेशातून मोठी मागणी आहे. या व्यावसायातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. गेल्या काही वर्षामध्ये मच्छीमारांना चांगला पैसा मिळवून देणारे तारली, सुरमई, पापलेट, सरंगा आदी मासे गायब झाले आहेत. त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. गतवर्षीपेक्षा यंदा उत्पन्न आर्थिक उलाढालीच्या तुलेनमध्ये संमिश्र हंगाम राहीला. तुटवड्यामुळे सुकी मासळी महागली. सुरुवातीला समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे मच्छीमार आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते. मात्र, हंगामाच्या शेवटी बऱ्यापैकी मासे मिळाल्यामुळे मच्छीमार तरले आहेत. साखरीनाटे बंदरात वर्षभराच्या हंगामात सुमारे वीस हजार टन मासे मिळतात. मात्र, यंदा त्यामध्ये घट झाली आहे. सुमारे 15 हजार टन मासे मिळाल्याची माहिती मच्छीमार अमजद बोरकर यांनी दिली. वर्षभरामध्ये होणाऱ्या सुमारे 300 कोटींच्या उलाढालीत यंदा घट होऊन ती 200 कोटींवर आल्याचेही त्यांनी सांगितले. मच्छीमारांची संख्या 67 हजारांवर जिल्ह्यातील मच्छीमारांची संख्या 67 हजार 615 पेक्षाही जास्त आहे. त्यामध्ये क्रियाशील मच्छीमारांची संख्या 25 हजार 286 आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 2477 यांत्रिकी व 2146 बिगर यांत्रिकी मच्छीमारी नौका आहेत.

Exit mobile version