। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या 240 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 191 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. एकुण 618 मतदान केंद्रांवर मतदान होत असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत 2 लाख 90 हजार 142 मतदारांपैकी 61 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सरासरीनुसार 21.33 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांनी दिली.
240 पैकी 191 सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. 240 सरपंचपदासाठी 531 उमेदवार तर 1 हजार 940 सदस्यपदासाठी 3 हजार 238 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. 618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी 16 डिसेंबर 2022 रोजी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अलिबाग 06, मुरुड 05, पेण 26, पनवेल 10, उरण 18, कर्जत 07, खालापूर 14, रोहा 05, सुधागड 14, माणगाव 19, तळा 01, महाड 73, पोलादपूर 16, म्हसळा 13, श्रीवर्धन 13 या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. 240 पैकी मुरुड मधील 01, पेण 02 उरण 01, माणगाव 03, महाड 22, पोलादपूर सात अशा 49 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये 20 केंद्रांवर 9 हजार 255 मतदारांपैकी 1 हजार 867 मतदारांनी आपला मतदानांचा हक्क बजावला एकुण टक्केवारीनुसार 20.17 टक्के मतदान तालुक्यात झाले. मुरुड तालुक्यात पाचपैकी चार ग्रामपंचायतींमध्ये 12 केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून 6 हजार मतदारांपैकी 1 हजार 123 मतदारांनी मतदान केले असून 18.72 टक्के मतदान झाले आहे. पेण तालुक्यात 26 पैकी 25 ग्रामपंचायतींसाठी 83 केंद्रांवर मतदान होत असून 44 हजार 205 पैकी 9 हजार 569 मतदारांनी मतदान केले. सरासरीनुसार 21.65 टक्के एवढे मतदान झाले आहे.
पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये 47 केंद्रावर 24 हजार 988 मतदारांमधून 5 हजार 598 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला 22.40 टक्के इतके मतदान झाले. उरण तालुक्यात 18 पैकी 17 ग्रामपंचायतीच्या 61 केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून 31 हजार 653 मतदारांपैकी 6 हजार 402 जणांनी मतदान केले. टक्केवारीनुसार 20.23 टक्के इतके मतदान झाले आहे. कर्जतमध्ये सात ग्रामपंचायतींमध्ये 25 मतदानकेंद्रांवर 17 हजार 589 मतदारांपैकी 3 हजार 910 मतदारांनी आपला हक्क बजावला 22.23 टक्के सरासरीनुसार मतदान झाले आहे. खालापूर तालुक्यामध्ये 14 ग्रामपंचायतीच्या 42 मतदान केंद्रांवर 21 हजार 416 मतदारांपैकी 4 हजार 818 मतदारांनी मतदान केले. 22.50 टक्के इतके येथे मतदान झाले आहे. रोहा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीत 15 मतदान केंद्रांवर 6 हजार 225 मतदारांमधून 1 हजार 672 जणांनी मत टाकले. सर्वाधिक जास्त 26.86 टक्के मतदान रोहा तालुक्यात झाले आहे.
सुधागड तालुक्यात 14 ग्रामपंचायतीत 41 मतदान केंद्रात 18 हजार 905 मतदारांपैकी 4 हजार 125 जणांनी मतदानाचा हक्क बजावला सरासरीनुसार 21.82 टक्के मतदान झाले. माणगाव तालुक्यामध्ये 19 पैकी 16 ग्रामपंचायतीसाठी 52 केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून 28 हजार 442 मतदारांपैकी 5 हजार 987 अशा 21.05 टक्के इतके मतदान झाले आहे. तळा तालुक्यात एकमेव ग्रामपंचायतीसाठी तीन केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून 1 हजार 841 मतदारांपैकी 88 मतदारांनी मतदान केले आहे. सरासरीनुसार सर्वात कमी 4.78 टक्के इतके मतदान या तालुक्यात झाले आहे. सर्वाधिक जास्त ग्रामपंचायती निवडणूका असलेल्या महाड तालुक्यात 73 पैकी 51 ग्रामपंचायतीत मतदान होत असून 152 मतदान केंद्रामध्ये 55 हजार 793 मतदारांपैकी 11 हजार 709 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 20.99 टक्के इतके मतदान झाले आहे.
पोलादपूर तालुक्यात 16 पैकी 7 ग्रामपंचायतीमध्ये 21 मतदान केंद्रांवर 7 हजार 195 मतदारांपैकी 1 हजार 733 मतदारांनी मतदान केले. सरासरीनुसार 24.09 इतके या तालुक्यात मतदान झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यात 13 पैकी 9 ग्रामपंचायतीमध्ये 26 मतदान केंद्र असून एकुण 10 हजार 492 मतदारांपैकी 1 हजार 954 मतदारांनी आपला हक्क बजावला. तर म्हसळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतीसाठी 18 मतदान केंद्रांवर 6 हजार 143 मतदारांपैकी 1 हजार 324 मतदारांनी मतदान केले. सरासरीनुसार 21.55 टक्के एवढे मतदान म्हसळा तालुक्यात झाले आहे.