उद्यापासून 21 जिल्हे अनलॉक


रायगडात मात्र अद्यापही निर्बंधच
मुंबई | प्रतिनिधी |
लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या 21 झाली आहे. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.


निर्बंधमुक्त जिल्हे
अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये जनजीवन सुरळीत सुरू होईल.

मुंबई जिल्ह्यात रुग्ण घटूनही महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. ठाणे, पुणे मात्र निर्बंधमुक्त होत आहे. कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण लक्षात घेत आणि खाटांची उपलब्धता या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. दुकाने खुली ठेवण्याची वेळ दुपारी 4 वाजेपर्यंतच राहणार आहे. तर सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदीही कायम असणार आहे.

Exit mobile version