लालपरीवर पंढरीच्या विठ्ठलाची कृपा;रायगड विभागाला 21 लाखांचा नफा

तब्बल 64 हजार 897 किमी प्रवास
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील आठ आगारातून 60 जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामाध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल 21 लाख 30 हजार 373 रुपयांची भर पडली आहे. मुरुड आगाराने सर्वाधिक तीन लाख 16 हजार 908 रुपयांचा गल्ला जमवला आहे. एवढा व्यवसाय करण्यासाठी एसटीने सुमारे 64 हजार 897 किमीचा प्रवास केला आहे. कोरोना कालावाधीनंरची ही वाढ असल्याने एसटी महामंडळासाठी दिलासादायक चित्र असल्याचे बोलले जाते.

कोरोना काळात एसटी मंहामंडळाची प्रवासी वाहतुक बंद होती. त्यामुळे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाचा प्रकोप सुरु असतानाच एसटीवर आणखी दुसरा आघात झाला. एसटीच्या लाखो कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले. सुमारे सहा महिने संप सुरु असल्याने एसटीच्या फेर्‍या बंद असल्याने एसटीच्या उत्पन्नामध्ये घट वाढतच गेली.

कोरोना महामारीच्या कालावधीत पंढरपुरला जाणार्‍या भाविकांनाही इच्छा असतानाही जाता आले नाही. सलग दोन वर्ष त्यांची वारी हुकली. गेल्या जूनमध्ये कोरोनाचा प्रभाव म्हणावा तसा दिसत नसल्याने सरकारने वारीला परवानगी दिली. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. एसटी महामंडळही तातडीने त्यांच्या दिमतीला धावून आली. रायगड जिल्ह्यातील आठ बस आगारातून पंढरपुरला जाण्यासाठी 60 जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे भक्तांची चांगलीच सोय झाल्याचे पहायला मिळाले.

जादा गोड्या सोडण्यात आल्याने रायगड विभागातून एसटी महामंडळाला तब्बल यामाध्यमातून एसटीला 21 लाख 30 हजार 373 रुपयांची भर पडली आहे. मुरुड आगाराने सर्वाधिक तीन लाख 16 हजार 908 रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यापाठोपाठ महाड आगाराने दोन लाख 97 हजार 19 रुपयांचा व्यवसाय केला. सर्वात कमी व्यवसाय पेण आगाराने एक लाख 78 हजार 185 रुपयांचा केला आहे.

रायगड जिल्ह्यातील आठ आगारातून आषाढी एकादशी निमीत्त 60 जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामाध्यमातून एसटीला 21 लाख 30 हजार 373 रुपयांचा व्यवसाय करता आला. मागील दोन वर्षात कोरोनामुळे वारीला परवानगी नसल्याने जादा बस सोडण्यात आल्या नव्हत्या. या वर्षी मात्र तशी परिस्थिती नव्हती.

-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड


आगारनिहाय मिळालेले उत्पन्न
महाड – 2,97,619
अलिबाग – 2,48,490
पेण – 1,78,185
श्रीवर्धन – 2,80,345
कर्जत – 2,42,565
रोहा – 2,84,582
मुरुड – 3,16,908
माणगाव – 2,81,679
एकूण 21,30,373

Exit mobile version