रायगड जिल्ह्यातील 21 एसटी कर्मचारी बडतर्फ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सुुमारे तीन महिन्यांपासून संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास रायगड विभागाने सुरुवात केली असून आतापर्यंत जिल्ह्यातील 21 कर्मचार्‍यांना बडतर्फ करुन घरी बसविण्यात आले आहे. तत्पुर्वी परिवहन महामंडळाने कर्मचार्‍यांच्या घरोघरी जाऊन त्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

त्यानुसार हजर होणार्‍या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन केले जात आहे. मात्र त्यानंतरही उपस्थित न होणार्‍या कर्मचार्‍यांची कसलीच गय न करता बडतर्फ केले जाईल असा इशारा विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 850 कर्मचारी हजर झाले असून जिल्ह्यातील सर्वच डेपातून सुमारे 400 एसटीच्या फेर्‍या सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

रायगड परिवहन विभागात अलिबाग, पेण, कर्जत, खोपोली, मुरुड, माणगाव, महाड आणि श्रीवर्धन हे आगार कार्यरत आहेत. कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्यानंतर सर्वच आगारातील कर्मचारी यात सहभागी झाले होते. प्रशासनाच्या शिष्टाईनंतर पेण, माणगाव, महाड, रोहा, कर्जत तसेच श्रीवर्धन आगारातील कर्मचारी हळूहळू कामावर हजर झाले. त्यामुळे काही अंशी एसटी वाहतूक सुरु झाली. मात्र मुरुड आणि अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी आपला हट्ट कायम ठेवत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे या आगारातून आतापर्यंत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच एसटी फेर्‍या सुरु होऊ शकल्या होत्या.

वारंवार आवाहन करुनही कामावार हजर न झालेल्या कर्मचार्‍यांपैकी कर्जत आगारातील 13, अलिबाग आगारातील 5 तर मुरुड आगारातील 3 अशा एकुण 21 कर्मचार्‍यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 574 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर 121 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे. 143 जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील सर्व आगारातील कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर हजर व्हावे. तातडीने कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कोणतीच कारवाई केली जाणार नाही. मात्र त्यानंतर देखील जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल. याला तेच कर्मचारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.

अनघा बारटक्के ,विभागीय नियंत्रक

Exit mobile version