रायगडातील 22 अपघातग्रस्त ठिकाणे निश्‍चित

सुरक्षा यंत्रणेची राहणार नजर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जिल्ह्यात 22 अपघात प्रवणक्षेत्र निश्‍चित कऱण्यात आली आहेत. यात महामार्गांवरील 18 राज्यमार्गांवरील 2 तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील 2 अपघात प्रवणक्षेत्रांचा समावेश आहेत. या अपघात प्रवणक्षेत्रांवरील अपघात कमी करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत.

यात 22 ठिकाणे ही अतिधोकादायक आढळून आली आहेत. या ब्लॅक स्पॉटची पहाणी करून तेथील धोकादायक परिस्थिती कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. संसदीय रस्ते सुरक्षा समितीची एक बैठक नुकतीच अलिबाग येथे पार पडली. यात खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार सुनील तटकरे यांनी या ब्लॅक स्पॉट संदर्भात करण्यात येणार्‍या कार्यवाहीचा आढावा घेतला. यानंतर रस्ते अपघात कमी करण्यासाठी तातडीने दिर्घकालिन उपाययोजना सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या होणार उपाययोजन
राष्टीय महामार्ग क्रमांक 48 वर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक चिन्हांचे बोर्ड, मार्गदर्शक चिन्हांचे बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड, रम्बलर स्ट्रिप्स, कॅट आईस व ब्लिंकर्स बसविण्यात येणार आहेत. कशेडी घाटामध्ये आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड, मार्गदर्शक बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड बसविण्यात येणार आहेत. या शिवाय पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई जुना महामार्ग तसेच अन्य महामार्गांवरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी 24 तास वायूवेग पथक ठेवली जाणार आहेत. या पथकामार्फत विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, लेन कटिंग, ओव्हरस्पीडींग, प्रखर दिवे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, रिफ्लेक्टर्स, ब्रेक लाईटस् व्यवस्थित नसणे, अशा अनेक चुकीच्या बाबींसाठी वाहनचालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स यांनी रस्त्यावर अवैधरित्या रस्ता दुभाजक बनविलेले असून त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते, यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक बंद करण्याची आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

अपघात कारणांचा शोध
जिल्ह्यात होणार्‍या अपघातांमागील कारणांचा शोध घेण्यासाठी IRD प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आली आहे. अपघात झालेल्या वाहनाची माहिती संबंधित पोलीस स्टेशन मार्फत IRD प्रणालीवर करण्यात येते व त्यानंतर या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित अपघाताची तपासणी होऊन त्याचा अहवाल IRD प्रणालीवरच अपलोड करत असतात. यामुळे अपघातांच्या कारणांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

Exit mobile version