प्रधानमंत्री मोदींनी काशीतून जाहीर केली रक्कम
| रायगड | खास प्रतिनिधी |
तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काशीमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जाहीर केला. रायगड जिल्ह्यातील सुमारे एक लाख 10 हजार 94 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. त्यांच्या बँक खात्यात 22 कोटी एक लाख 88 हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
सध्या खरिपाचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र शेतकऱ्यांची शेतीच्या कामांसाठी लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधांसारख्या कृषी संलग्नबाबीची आवश्यकता आहे. 17 हप्ता हा याच कामासाठी शेतकऱ्यांना मदतगार ठरणार आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी किसान संवाद कार्यक्रमांतर्गत 21 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. कृषी सखी म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रही देण्यात आले. काशी येथून डिजिटल किसान क्रेडिट कार्डही त्यांनी लॉन्च केले. शिवाय, सेंद्रिय शेती करणाऱ्या 167 किसान सखींनाही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात दिले आहेत. याआधी 10 जून रोजी मोदींनी पीएम किसान योजनेच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती, जी त्यांनी पास केली आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या 16 हप्त्यांमध्ये आतापर्यंत 12 कोटी 33 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम डीबीटीमधून थेट वितरित करण्यात आली होती.
16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला वितरीत मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या निर्णयानुसार किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी दिला. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे 16 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता (पीएम किसान 16 वा हप्ता) 28 फेब्रुवारी 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता.
20,000 कोटी रुपये वितरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी त्यांच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. ज्यामध्ये 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 वा हप्ता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुमारे 20,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.