रायगडात तब्बल 22 दिवस धोक्याचे

Thiruvananthapuram: High tidal waves crash on the shore at the Vizhinjam harbour in Thiruvananthapuram, Thursday, June 8, 2023. An alert has been issued in the view of Cyclone Biparjoy. (PTI Photo) (PTI06_08_2023_000147B)

समुद्राच्या उधाणाचा 114 गावांना धोका

| रायगड । प्रतिनिधी ।

यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्रात उधाण येणार असल्याने रायगड जिल्ह्यातील 114 गावांमध्ये साडेचार मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार आहे. 20 सप्टेंबरला सर्वांत मोठी भरती समुद्र किनार्‍यावरील नागरिकांना अनुभवता येणार आहे. भरतीमुळे नदीचे पाणी ओसरत नसल्याने खाडी व नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण होत असल्याने या गावातील नागरिकांना याकाळात सतर्क राहावे लागणार आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामस्थ दरड, पूर व उधाणाची भरतीच्या दहशतीखाली वावरत असतात. रायगडमधील अनेक गावे समुद्र व खाडीकिनारी असून 240 किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. हा किनारा जिल्ह्यातील निसर्गसौंदर्यात भर टाकत असला तरी मोठ्या भरतीच्या वेळी हेच किनारे धोकादायक ठरतात. पावसाळ्यात मोठ्या लाटांचे पाणी अनेकदा गावात व शेतात शिरून नुकसान होते. 2005 मध्ये 25 व 26 जुलैला जिल्ह्याला पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. पुरामुळे व दरड कोसळून महाड तालुक्यात 192 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यंदा पावसाळ्यात एकूण 22 दिवस मोठी भरती येणार असून किमान साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनार्‍यावरील गावांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्हात समुद्र किनारी 55 तर खाडीकिनारी 59 गावे आहेत. यात श्रीवर्धन तालुक्यातील 19, अलिबागमधील 16, पनवेलमध्ये 11, मुरूड तालुक्यातील नऊ, उरणमधील चार गावांचा समावेश आहे, तर खाडीकिनारी असलेल्या पेण तालुक्यातील नऊ, अलिबाग 11, उरण पाच, श्रीवर्धन 11, माणगाव दोन, महाड सहा व म्हसळ्यातील 11 गावांना उधाणाचा धोका आहेत. उधाण भरती व अतिवृष्टी एकाच वेळी झाल्यास सखल भागातील गावांत पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. भरतीमुळे पाणी ओसरत नसल्याने नदीकाठच्या महाड, नागोठणे, रोहा या गावात पूरस्थिती निर्माण होते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून किनार्‍यावरील गावांना उधाणाच्या भरतीबाबत कळवले जाते, तसेच पावसाळ्यापूर्वी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेबाबतही संबंधित गावांना कळवून खबरदारी घेतली जाते.

आराखडे तयार करण्याचे निर्देश
यंदा पावसाळ्यातील जूनमध्ये सात दिवस, जुलैमध्ये चार, ऑगस्टमध्ये पाच तर सप्टेंबरमध्ये सहा दिवस उधाणाची शक्यता आहे. या दिवशी साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा आणि मोठी भरती येण्याचा शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनार्‍यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त गावांना धोका मोठ्या भरतीच्या काळात उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
या तारखांना साडेचार मीटरपेक्षाही उंच लाटांची शक्यता
जून: 4, 5, 6, 7, 8 ,23, 24
जुलै: 22, 23, 24,25
ऑगस्ट: 19, 20 ,21 ,22 ,23
सप्टेंबर: 17 ते 22
Exit mobile version