। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कृषी कायद्यासाठी दिल्लीत आंदोलन करून केंद्र सरकारला जेरीस आणणारे शेतकरी आता निवडणुकीच्या रणमैदानातही उतरणार आहेत. पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 22 शेतकरी संघटना एकत्रितपणे उतरणार आहेत. या शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बलबीर सिंग राजेवाल यांचं नावही जाहीर केलं आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात ट्विस्ट आले आहे. शेतकरी संघटना निवडणुकीत उतरल्याने त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंजाबमधील शेतकर्यांनी संयुक्त समाज मोर्चा नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत एकूण 22 शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. चंदीगडमध्ये या नव्या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. या संघटनेने पंजाबच्या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला असून विधानसभेच्या सर्वच्या सर्व 117 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे लोकांनी आम्हला पाठिंबा द्यावा, असं आवाहन मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी केले आहे. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या 22 संघटना एकत्र आल्या असून त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सात संघटनांनी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी या मोर्चात सहभागी होण्यासही नकार दिला आहे. आम्ही नव्या मोर्चात सहभागी झालेलो नाही. आमचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही या मोर्चाचे समर्थक नाही आणि त्यांचे समर्थक नाही आहोत, असे या सात संघटनांनी स्पष्ट केले आहे.