22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धा

हायलँडर एफसी, इन्फंट्स एफसी, थंडरकॅटस एफसी उपांत्य फेरीत

| पुणे | वृत्तसंस्था |

गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22 व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत हायलँडर एफसी, इन्फंट्स एफसी यांनी तर सुपर डिव्हिजन गटात थंडरकॅटस एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जुनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत हायलँडर एफसी संघाने अशोका एफसी संघाचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून तनिश सोनवणे, साई देशमुख, अर्जुन सुपे, आयुष दिवार, कौस्तुभ शिंदे यांनी सुरेख कामगिरी केली. तर पराभूत संघाकडून स्वराज येवलेला गोल करण्यात अपयश आले.दुसऱ्या सामन्यात स्टीफन काटे(35 मि) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर इन्फंट्स एफसी संघाने सिटी एफसी पुणे संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. याआधीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पुणेरी वॉरियर्स संघाने सनी डेज एफसी संघाचा 4-2 असा पराभव केला. पुणेरी वॉरियर्स संघाकडून पियुश कुलकर्णी (28,51 मि.) ने दोन गोल तर, विकास गुप्ता (35मि.), राहुल कड (55 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

सुपर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत थंडरकॅटस एफसी संघाने संगम यंग वन्स संघाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरी सुटल्यामुळे टायब्रेकरपद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये थंडरकॅटस संघाकडून क्षितिज कोकाटे, आरोह जोधवानी, ऋषी कराळे यांनी गोल केले. तर, संगम यंग वन्सच्या मार्शल एमसी, गौरव मोरे यांनी मारलेले चेंडू थंडरकॅटस एफसीचा गोलरक्षक प्रतीक स्वामीने अफलातून बचाव करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Exit mobile version