जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा; वर्षभरात 668 अपघातात 236 जणांचा मृत्यू

मागील पाच महिन्यांत 169 अपघातात 77 जणांचा मृत्यू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, मार्गांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास तीन ते पाच अपघात होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2022 या 12 महिन्यांत जिल्ह्यात 668 अपघात झाले असून, यामध्ये 236 जणांचा मृत्यू झाला तर 630 जण जखमी झाले आहेत. तर मागील पाच महिन्यांत 169 अपघात झाले असून 77 जणांचा अपघातात मृत्यु झाला आहे. तर 137 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी पोलीस विभागाने पाऊल टाकले असून, विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरु असल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2022 या 12 महिन्यात जिल्ह्यात 668 अपघात झाले असून, यामध्ये 236 जणांचा मृत्यू झाला तर 630 जण जखमी झाले आहेत. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. एवढे करूनही अपघातांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेमार्फत विशेष परिश्रम घेण्यात आले आहेत. विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई, ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी, महामार्गावर चारचाकी गाड्यांचा वेग तपासणे, सीटबेल्ट न लावणार्‍या चालकांवर कारवाई यासह गाडी चालविताना मोबाईलवर बोलणार्‍या मोटारसायकलस्वारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

– अश्‍वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक.

जिल्ह्यात झालेले अपघात दृष्टिक्षेप
सन 2021 –
एकूण अपघात – 688
मृत्यू – 236
जखमी – 630

अपघाताची प्रमुख कारणे –
महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे, रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने, धोकादायक वळणे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसर्‍या बाजूला नेणे, मद्य पिऊन वाहन चालविणे.

Exit mobile version