जिल्ह्यातील 24 पोलिस ठाणी झाली स्मार्ट

पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न

| रायगड | प्रतिनिधी |

समान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दल असलेली प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न गृह विभागाकडून केले जात आहेत. आता पोलिस ठाण्यांमध्ये प्रसन्न वातावरणासह पेपरलेस व ऑनलाइन कामकाजावर भर दिला जाणार आहे. राज्य सरकारने स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना पुढे आणली असून जिल्ह्यातील 28 पैकी 24 पोलिस ठाणी ही स्मार्ट करण्यात आली आहेत. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

पोलिस ठाणी स्मार्ट होताना बाह्यरंग बदलण्यासोबतच कार्यपद्धतीतही बदल करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा पोलिस ठाण्यातील कार्यपद्धती सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. एखाद्या कार्यक्रमाची परवानगी असो की गुन्ह्याचा तपास, पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणूकीमुळे पोलिसांबाबत मनात चिड उत्पन्न होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिस दलाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना पुढे आणली आहे. सर्व कर्मचाऱ्यांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन असावेत, तसेच त्यांना इंटरनेट वापरण्याचे कौशल्य असावे, अशी या योजनेतील वैशिष्ट्ये आहेत. कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपीने घेतली की कामकाजही गतिमान होईल. तक्रारदाराला किंवा अर्जदाराला पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत, हा त्यामागील उद्देश आहे, असे घार्गे यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात जाण्यास तयार नसला तरी नोकरी, पासपोर्टसाठी आवश्यक असलेली चारित्र्य पडताळणी, शस्त्र परवाने, सांस्कृतिक कार्यक्रमांची परवानगी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनीक्षेपकाची परवानगी, उपोषण, मोर्चे, सार्वजनिक सभा यांच्यासाठी पोलिस ठाण्यात पत्रव्यवहार करावाच लागतो. यासाठी फेऱ्या मारूनही कामे वेळेवर होत नाहीत. वास्तविक हे काम ऑनलाइन शक्य आहे. यातील काही परवानग्या ऑनलाईन देण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे; परंतु यास गती आल्याचे दिसून येत नाही.

पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखताना परवानग्यांशिवाय इतर अनेक कामे करावी लागतात. यासाठी करावा लागणारा पत्रव्यवहार ऑनलाईन पद्धतीने गतिमान झाल्यास कामकाजाच्या वेळेची बचत होईल, शिवाय इतर कामांनाही वेळ देता येईल. कागदी पत्रव्यवहारात न अडकता झटपट ऑनलाईन कामकाज सुलभ करण्याचा गृह विभागाचा प्रयत्न आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील 28 पोलिस ठाण्यात पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत, असेही घार्गे म्हणाले.

कसे आहे स्मार्ट पोलिस ठाणे
स्मार्ट पोलिस ठाणे अंतर्गत नागरिकांना ठरवून दिलेल्या सेवा, 24 तास पुरवण्यासाठी कटिबद्ध असणे, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा, नागरिकांच्या गरजेनुसार यशस्वीरीत्या राबविणे, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर प्रस्थापित करणे, कार्यप्रणालीत वेळोवेळी सुधारणा करणे, पोलिस ठाण्यांचा परिसर स्वच्छ असणे, इमारत सुसज्ज असणे, पोलिस ठाण्यामधील सर्व अभिलेख अद्ययावत असणे, पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देणे.
कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा
कर्मचारी व अधिकारी यांचे स्वास्थ्य अबाधित राखण्याकरिता सुसज्ज खेळाचे मैदान असणे, पोलिस कर्मचारी तसेच नागरिकांसाठी पार्किंग व्यवस्था असणे, महिलांसाठी स्वतंत्र दालन असणे, नागरिकांच्या सोयीकरिता पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती दर्शविणारे फलक असणे, पोलिसांच्या कारभारात गतिमानता आणताना कामकाजात पारदर्शकता, कार्यालयात प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पोलिस ठाण्यात उपलब्ध पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. डिजिटलायझेशनमुळे पोलिस ठाण्यात वायफाय सर्व ठिकाणी राहील. सध्या ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचे काम सुरू झाले असले, तरी इतरही अनेक समस्या इंटरनेटच्या स्मार्ट वापराने कमी करता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version