शहीद गनमास्टर निलेश तुणतुणे यांचा २४वा स्मृतीदिन संपन्न

रायगड पोलिस दलाकडून बंदुकीच्या तीन फैऱ्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शहीद गनमास्टर निलेश तुणतुणे यांचा 24 वा स्मृतीदिन सोमवारी अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी या ठिकाणी अगळ्या वेगळ्या उपक्रमांतून साजरा करण्यात आला. रायगड पोलिस दलाकडून बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडीत निलेश तुणतुणे यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट व अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्यातील गनमास्टर निलेश तुणतुणे यांच्या 24 व्या स्मृतिदिनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. सुरुवातीला रायगड पोलीस दलाकडून बंदूकीच्या फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर माजी सैनिक उमेश वाणी यांच्यातर्फे शहीद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

यावेळी प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त सुभेदार साळुंखे, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, अलिबागचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी सुरक्षा संघटन मुंबई, कोकण विभागाचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. के. डी.पाटील, निलेश तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, आई निर्मला तुणतुणे सहाण ग्रामपंचायतीच्या सरपंच राखी पाटील, उपसरपंच सौंदर्या पोईलकर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत झिराड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे शहिद निलेश तुणतुणे यांना मानवंदना दिली. कोएसो रामभाऊ पाटील बामणगाव हायस्कूल च्या संगीत कलापथकाने निर्मला पाटील आणि पेढवी यांनी संगीत साज चडवत संगिताजली अर्पण केली. त्यानंतर चोंढी येथील स. म. वडके हायस्कूलमधील आरएसपी विद्यार्थ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व मंडळींकडून शहिद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

Exit mobile version