चिंचोटी पिडीतेच्या कुटूंबाला गेलतर्फे २५ लाखाची मदत

शेकाप महिला आघाडीच्या देवयानी पाटील यांना यश
पोलिस अधिक्षक कार्यालयातील बैठकीत निर्णय

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चिंचोटी येथील अतिप्रसंगाच्या घटनेप्रकरणी मंगळवारी जंजिरा सभागृहातील बैठकीनंतर आज जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पिडीतेच्या कुटूंबाला गेल कंपनीच्या कंत्राटदारांच्या माध्यमातून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक परप्रांतीयांनी गाशा गुंडाळत यापूर्वीच गाव सोडले आहेत. असलेल्या कामगारांबाबत महिनाभरात बदल करुन स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे देखील या बैठकीत ठरले. शेकाप महिला आघाडीच्या सदस्या देवयानी पाटील यांनी या प्रकरणात मोठी भुमिका बजावल्याने ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक होत आहे. आ. जयंत पाटील यांनी हा प्रश्‍न विधानपरिषदेत उपस्थित केल्याने गेल प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

मंगळवारच्या बैठकीत पिडीतेला न्याय मिळेपर्यंत गेल कंपनीचे काम चालु देणार नाही अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतल्याने त्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला देवयानी पाटील यांच्यासह अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड प्रविण ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, संजय पाटील, श्रीधर भोपी, अ‍ॅड राकेश पाटील, प्रणिता पाटील, गेल कंपनीचे अधिकारी जितीन सक्सेना, अनुप गुप्ता तसेच कंत्राटदार आदी उपस्थित होते.

संबंधीत पिडीतेला गेलकडून 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणीवर कंपनी प्रशासनाकडून पिडीत अथवा तीच्या कुटूंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र नोकरी करण्याची मानसिकता नसल्याने हा प्रस्ताव नाकारुन त्याऐवजी एक रकमी मदत करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार ग्रामस्थ आणि गेल प्रशासनाने सुवर्णमध्य काढत कंत्राटदारांच्या माध्यमातून 25 लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दाखवली. त्यावर सर्वांनी मान्यता दिली.

यावेळी परप्रांतीय कामगारांऐवजी स्थानिकांना रोजगार देण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच भविष्यात कंपनी उभी राहील्यानंतर त्यासाठी लागणारे स्किल कर्मचार्‍यांच्या दृष्टीने त्यासाठीच्या गाईडलाईन, आवश्यक पात्रता स्थानिकांना कळवून त्यांना प्रशिक्षीत करण्याबाबत देखील सुचना बैठकीत करण्यात आल्या. परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत देखील सुचना करण्यात आल्या. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कंपनीबाबत वेगळी नियमावली बनविण्यात आली आहे. ठेकेदाराने काय काळजी घ्यावी.

Exit mobile version