पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधत केली सुटकेची मागणी
। भारत रांजणकर । अलिबाग ।
डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले रायगडातील 26 विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागात अडकले आहे. रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल या तालुक्यातील विद्यार्थी अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत माहिती प्राप्त झाली असून त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. लवकरात लवकर आम्हाला भारतात घेऊन या अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारत देशातील 12 हजार पेक्षा जास्त लोक युक्रेन मध्ये असून त्यातील 1200 च्यावर विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनास विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील डॉक्टरी शिक्षणासाठी गेले 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रयत्न करीत आहे.
आर्यन पाटील ( पेण झिराडआळी), कोमल पाटील (पेण शिर्कि बोरावे), अभिजित अशोक थोरात (खोपोली), साहिल म्हामूणकर (पनवेल लाडीवली), मुग्धा मोरे (महाड), पूर्वा पाटील (अलिबाग धेरंड), समीक्षा शिरसाट (पनवेल खारघर), यश काळबेरे (तळा), कल्पित मढवी (पेण), श्रद्धा पाटील (पेण), प्रेरणा दिघे (पेण), अद्वैत गाडे (पनवेल), विजया माने (कर्जत), श्रेयस टिळे (पनवेल), रुशवंती भोगले (पनवेल), साई मोरे (खालापूर), कुणाल कुवेसकर (पनवेल), शिल्पीता बोरे (पनवेल), अमर करंजीकर (माणगाव), तुराम बेरादर (बिरवाडी महाड), शोहिब पठाण (बिरवाडी महाड), सालवा धनसे (खोपोली), प्रचिती पवार ( करंजाडे पनवेल), नाहुश गायकवाड (नागोठणे, रोहा), श्रेयस तिळे (कर्जत), राम बेरदार, (बिरवाडी,महाड) येथील एक विद्यार्थी असे एकुण 26 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत.
पेण शिर्की बोरावे येथील कोमल पाटील या झापोरिझिया या शहरात असून त्यांच्यासोबत कृषीवलने संपर्क साधला असता त्यांनी सध्यातरी इथली परिस्थिती सामान्य असल्याचे सांगितले. मात्र कनेक्टीव्हीटी कमी असल्याने घरच्यांसोबत देखील मेसेजवर संपर्क साधला जात असल्याचे सांगण्यात आले. 1 हजार भारतीय विद्यार्थी आपल्या सोबत असून दुपारी 2 च्या सुमारास आम्हाला बेसमेंट मध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना तयारीत राहण्याचा निरोप दिला गेला असून कुठल्याही वेळी त्यांना न्यायला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर खोपोली येथील अभिजीत थोरात याच्याशी संपर्क साधला असता त्याच्या म्हणण्यानुसार इथल्या इथली परिस्थिती खराब होत असून जेवढे अन्न धान्य उपलब्ध झाले तितके ते आम्ही घेतले आहे. मात्र आता सुपर मार्केमधील अन्न धान्याचा साठा संपला असून पैसे संपले असल्याने बँकेतून देखील पैसे काढता येत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आम्ही सर्व कागदोपत्री प्रकिया पुर्ण केली आहे, आम्हाला महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने लवकरात लवकर आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी परत न्यावे.