वर्षभरात रस्ते अपघातात 260 बळी

| पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई, उरण, पनवेलसह नवी मुंबईमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अतिवेग, नियमांचे उल्लंघन व खराब रस्त्यांमुळे जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 669 अपघात झाले असून 260 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील औद्योगिकीकरण वाढत आहे. ठाणे- बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा बाजार समिती, जेएनपीटीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई – गोवा महामार्ग, मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोड या महत्त्वाच्या रस्त्यांवरून 24 तास वाहतूक असते. वाहनांची संख्या वाढत असून त्याच पटीमध्ये रस्ते अपघातही होत आहेत. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस विविध उपाययोजना राबवतात. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर आस्थापनांकडे पाठपुरावा करून अपघात होणार्‍या ठिकाणी आवश्यक ती कामे करून घेत आहेत. मात्र, या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.

बहुतांश घटना चालकांच्या चुकांमुळे
बहुतांश अपघात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अतिवेग, मद्यापान करून वाहने चालविणे, सिग्नलसह इतर नियमांचे उल्लघंन करणे, झोप येत असतानाही वाहन चालवल्याने अपघात होत आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी पोलिस रस्ता सुरक्षा वर्षभर जनजागृती केली जात आहे.

वेगावर नियंत्रण ठेवले, सीटबेल्ट हेल्मेटचा वापर केला व नियमांचे पालन केले, तर अपघात कमी करणे शक्य आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षेविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

तिरुपती काकडे
वाहतूक पोलीस उपआयुक्त


जानेवारी ते नोव्हेंबर अपघाताची स्थिती
अपघातांचा तपशील 2021 – 2022
एकूण अपघात 625 – 669
मूत्यू 246 – 260
गंभीर जखमी 390 – 417
किरकोळ जखमी 108 – 105

Exit mobile version