अपुऱ्या मनुष्य बळाचा महसूल कामावर परिणाम; सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा खोळंबा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून, तब्बल 293 पदे रिक्त आहेत. जिल्ह्याचा महसूल कारभार सध्या केवळ 956 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालविला जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त प्रशासकीय कामाचा ताण वाढला असून, त्याचा थेट परिणाम गतिमान प्रशासनावर बसत असून, शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांच्या कामांचादेखील खोळंबा होत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर भरती करून ही पदे भरावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
महसूल विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असतानाच, शासनाचा महसूल गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला टार्गेट दिले जाते. त्यानुसार महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करतात. त्यात बिनशेती शोध मोहिमेंतर्गत कारवाई करून दंड वसूल करणे, बेकायदेशीर बांधकाम, उत्खनन करणाऱ्यांना दंड आकारून त्यांच्याविरोधात कारवाई करणे, निवडणुकीच्या कालावधीत मतदान, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण घेणे, वेगवेगळ्या शिबिरांतून शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविणे, रोजगार हमी योजनेसह संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत शासनाचा निधी पोहोचविणे, अशी अनेक कामे महसूल विभागामार्फत केली जातात. याशिवाय जिल्ह्यात मंत्र्याचा दौरा आल्यावर त्याचे नियोजन करणे, ही देखील कामे महसूल विभागामार्फत केली जातात.
रायगड जिल्ह्यामध्ये महसूल विभागात जिल्हाधिकाऱ्यांपासून अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, लघुलेखक, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघु टंकलेखक, वाहन चालक, मंडळ अधिकारी, तलाठी (ग्राम महसूल अधिकारी), महसूल सेवक (कोतवाल) असे वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी काम करतात. ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित आहे.
जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांपासून ते कोतवालापर्यंतची एक हजार 231 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 956 पदे शासनाकडून भरण्यात आली आहे. या भरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी वेगेवेगळ्या कारणातून रजेवर जाणे, काही कर्मचारी दौऱ्यावर, काही कर्मचारी मंत्रालयात, तर काही कर्मचारी व्हीडीओ कॉन्फरन्सला असणे. त्यामुळे फक्त बोटावर मोजण्या इतक्या कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर प्रशासकीय कामकाज चालविले जात आहे. अपुऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार टाकला जातो. त्यामुळे प्रशासकीय कामकाज अनेक वेळा वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य करीत असतात. कामांचा खोळंबा होत असल्याचा त्रास कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांदेखील होतो. रायगड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी यांच्यासह कोतवालपर्यंतची 293 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या कोतवालांची 118, तलाठ्यांची 106, मंडळ अधिकाऱ्यांची 14, वाहन चालकांची 12 तर अव्वल कारकूनांची 10 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
अतिरिक्त कामाचा ताण
जिल्हाधिकारी कार्यालयासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी, कार्यालयामार्फत शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. शासनाचा महसूल वाढविण्यासाठी या विभागामार्फत शर्थीचे प्रयत्न केले जातात. बिनशेती शोधमोहीम, सभा, बंदूक परवाना, बेकायदा बांधकामे, निवडणूक अशा विविध कामांची पाहणी होत असताना, शासनाच्या रोजगार हमी योजनांसह इतर योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महसूल विभागामार्फत केले जाते. मात्र, अधिकारी, कर्मचारी अपुरे असल्याने एकाच कर्मचाऱ्यावर दोन ते तीन विभागांचा कारभार सोपविला जातो. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
रिक्त पदांवर दृष्टीक्षेप
पद - संख्या
उपजिल्हाधिकारी - 01
नायब तहसीलदार - 06
अव्वल कारकून - 10
लघुटंकलेखक - 02
महसूल सहाय्यक - 24
मंडळ अधिकारी- 14
तलाठी - 106
कोतवाल - 118
वाहन चालक - 12
एकूण - 293







