दुसरे मराठी विश्‍व संमेलन वाशीत


। पनवेल । प्रतिनिधी ।

मराठी भाषा विभागाकडून दुसर्‍या मराठी विश्‍व संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. हे संमेलन नवी मुंबईतील वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. दि.27 ते 29 जानेवारीदरम्यान हे संमेलन होणार आहे. यानिमित्त पुन्हा जगभरातील मराठी भाषाप्रेमी आणि मराठी उद्योजक व्यावसायिक एकत्र येऊन मायमराठीचे गुणगान करणार आहेत.गतवर्षी मराठा तितुका मेळवावा असा संदेश देत दि.4 ते 7 जानेवारीदरम्यान हे संमेलन मुंबईतील वरळी येथे घेण्यात आले होते. दुसरे संमेलन लांबणीवर पडले होते. त्याची दखल घेत लांबणीवर पडलेल्या संमेलनाची तयारी सुरू केली आहे. हे दुसरे संमेलन नवी मुंबईतील वाशी येथे दि.27 ते 29 जानेवारीदरम्यान घेतले जाणार आहे. लवकरच शासन निर्णय जारी होणार आहे. या संमेलनात मराठी पुस्तक प्रकाशन संस्था, लोकसाहित्याच्या क्षेत्रातील कलावंत, मराठी संस्कृतीचा वारसा जपणार्‍या संस्था आदींचा मोठा सहभाग राहणार आहे. या संमेलनासाठी देश-परदेशातून मराठी भाषाप्रेमी उपस्थित राहावेत, यासाठी त्यांना पत्रव्यवहार आणि संदेश देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

परदेशी मराठीप्रेमींसाठी पाच लाखापर्यंतची तरतूद
पहिल्या संमेलनापासून मराठी भाषा विभागाकडून परदेशातून येणार्‍या मराठी भाषाप्रेमींना तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत; तर देशातील इतर राज्यांतील मराठी भाषाप्रेमींना 50 हजार रुपये प्रवास खर्च, त्यांच्या राहण्यासाठी खर्चाची तरतूद केली होती. मागील वर्षी हा खर्च काहींनी स्वीकारला होता. यातच यंदा खासगी ट्रॅव्हल एजन्सीने परदेशातील मराठी भाषाप्रेमींना तिकिटांपासून ते अयोध्या आणि इतर स्थळांच्या भेटीचे पॅकेज तयार करून पाठवणे सुरू केल्याने अमेरिका आणि जपानमधील मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाशी येथे होणार्‍या दुसर्‍या विश्‍व मराठी साहित्य संमेलनासाठी परदेशातील सुमारे एक हजार 200 मराठी भाषाप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यातील 700 हून अधिक जणांनी या संमेलनासाठी येण्याचे कबूल केले आहे. उर्वरित मराठी भाषाप्रेमीही येतील. या वेळी संमेलन हे अधिक प्रभावी केले जाणार असून यासाठी प्रत्येक विभागाला पास दिले जाणार आहेत.

दीपक केसरकर, मराठी भाषा विकास मंत्री
Exit mobile version