| तळा | प्रतिनिधी |
तालुक्याची विश्रामगृहाची प्रतीक्षा आता संपणार आहे. तळा येथे विश्रामगृह बांधण्यासाठी राज्य सरकारने 3 कोटी 14 लाख 54 हजारांचा निधी मंजूर केला. गेली कित्येक वर्षे तळा येथे शासकीय विश्रामगृह व्हावे, अशी मागणी तळावासियांकडून केली जात होती. लवकरच इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
तळा हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. 1999 ला निर्मिती झालेल्या तळा तालुक्याला 23 वर्षे पूर्ण झाली. मात्र, तालुक्याला अद्यापही विश्रामगृह नव्हते. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तालुक्याचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा आहे. तालुक्यात कुडे लेणी, तळगड किल्ला, वावेहवेली धरण अशी पर्यटनस्थळे आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक, इतिहासकार येत असतात. त्याचबरोबर मंत्री, अधिकारी, पदाधिकारी यांच्या तळ्याच्या विकासाच्या दृष्टीने भेटी होत असतात.