जिल्ह्यातील 3 हजार 200 अंगणवाडी सेविका संपावर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी आजपासून संप पुकारला आहे. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील 3 हजार 200 अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या आहेत. आजपासून बुधवारपर्यंत (दि. 22) केवळ आहार वाटप करणार असल्याचे सेविकांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अध्यक्ष  एम. ए. पाटील, सरचिटणीस ब्रिजपाल सिंग, राजू सिंग, रायगड जिल्हा प्रमुख रश्मी म्हात्रेख् दिनकर म्हात्रे, रायगड प्रतिनिधी जिवीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांना अल्प मानधन मिळते. गेली 48 वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्‍न प्रलंबितच आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने अंगणवाडी ताईंचे प्रश्‍न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्‍वासन देऊन प्रजासत्ताकदिनाची तारीखही जाहीर केली होती. मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.

अंगणवाडी केंद्राचे भाडेही गेल्या वर्षापासून राज्य सरकारकडून न मिळाल्याने अंगणवाड्या बंद करण्याचा तगादा जागा मालक लावत आहेत. ते टाळण्यासाठी अनेक अंगणवाडी ताईंनी कर्ज घेऊन संबंधितांचे भाडे देऊन जागा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.  मध्यप्रदेश, तमिळनाडू, केरळ,कर्नाटक आदी राज्यांतही अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्रापेक्षा अधिक मानधन मिळते, यामुळे नाराज असलेल्या अंगणवाडी सेविकांनी 23 फेब्रुवारीपासून बेमुदत असहकार आंदोलनाचा निर्धार केला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे गर्भवती मातांना लहान बालकांना पोषण आहार मिळणार नसल्याने आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version