दिव्यांगाना मिळाला अंत्योदय योजनेचा आधार

| अलिबाग | प्रतिनिधी |
शासन व प्रशासन दिव्यांगाच्या दारी या कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील 30 दिव्यांगाना अंत्योदय योजनेंअतर्गत शिधापत्रिका देण्यात आली. या उपक्रमातून त्यांना योजनेचा आधार मिळाला. अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

दिव्यांगांच्या विकासासाठी व विविध समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका पातळीवर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात अलिबाग तहसिलदार प्रशासन व दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी तहसीलदार विक्रम पाटील, तालुका पुरवठा निरिक्षण अधिकारी प्रताप राठोड, निवडणुक नायब तहसिलदार अजित टोळकर,निवासी नायब तहसिलदार अमोल शिंदे तसेच दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, अलिबाग येथील राजमाता जिजाऊ दिव्यांग मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई, संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश तुरे, जिल्हा सचिव किशोर पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद घेवदे, तालुका संपर्क प्रमुख प्रसाद पाटील, उर्मिला पाटील, वैशाली पाटील, कल्याणी सुतार, शर्मिला पाटील तालुक्यातील दिव्यांग महिला व पुरुष तसेच लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी मुकेश चव्हाण म्हणाले, दिव्यांगांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी आमचे प्रशासन कटीबद्ध आहे. शासनाच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल प्रशासनाचे प्रयत्न कायम राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. जी. पाटील यांनी तर सुत्रसंचालन संघटनेचे सल्लागार रविंद्र थळकर यांनी केले.

Exit mobile version