रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे 30 टक्के लसीकरण

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
भारतात सुरू असलेला ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेकडून कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. शासनाने 15 ते 18 वर्षांखालील बाधितांना लसीकरण सुरू केले असून, जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजारपैकी 20 हजार 766 जणांना लस दिली. आतापर्यंत तीस टक्के जणांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे बाधित दिवसेंदिवस वाढत आहेत. 18 वर्षांखालील लसीकरण सर्वाधिक झाल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ऑक्सिजनवरील आणि अतिदक्षता विभागातील बाधितांचा आकडा एक आकडीच आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दोन मात्रा शंभर टक्के नागरिकांनी घेण्यावर भर देण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी 7 लाख 28 हजार 710 जणांनी दोन मात्रा घेतल्या आहेत.
केंद्र शासनाकडून 15 ते 18 वर्षांखालील तरुणांसाठी कोव्हॅक्सीनचे लसीकरण सुरू केले आहे. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी या वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाते. नियमित केंद्रांबरोबच शाळा, महाविद्यालयांमध्येही व्यवस्था केली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार यशस्वीपणे नियोजन केले जात आहे.
जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे 71 हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत 20 हजार 766 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. हा डोस घेणार्‍यांना ताप येत असला तरीही त्याचा प्रभाव जास्त काळ राहीलेला नाही. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाल्याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे नाहीत. 2007 मध्ये जन्म झालेल्या लाभार्थी लसीकरणासाठी पात्र ठरत आहे. हा वर्ग सुरक्षित करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

Exit mobile version