मिळकतखारमधील 300 हेक्टर शेती संकटात

120 एकर जागेतील कांदळवनाची कत्तल
ग्रामस्थांच्या तक्रारींकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

। अलिबाग । माधवी सावंत ।

अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील कांदळवनाच्या हरितपट्ट्यावर धनदांडग्यांचे नष्टचर्य सुरू असताना जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अनेकदा तक्रारी करुनही रेणूका हरकीसनदास वासवाणी व गोविंत बुलचंद वासवानी रिसोर्ट प्रा. लि तर्फे मिळकतखारजवळील सारळपूल ते आवळीपाडा येथील कांदळवनाच्या 120 एकर जागेत भराव टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मिळकतखार, रेवस, सारळ, म्हात्रोळी, चिडीपाडा येथील 300 हेक्टर भातशेती संकटात सापडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

वासवानी ग्रुपच्या मालकीची 120 एकर जमिन मिळकतखार येथे असून त्यांनी भराव टाकून कांदळवन नष्ट केले आहे. तसेच जवळपास 48 एकर जागेतील संपूर्ण खारफुटीची झाडे तोडून नष्ट करण्यात आली आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी तलाठी, तहसिलदार तसेच थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे खारफुटी नष्ट होऊन किनारपट्टीवरील गावे आणि वस्त्या धोक्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची टोलवाटोलवी सुरू असल्याचे समोर आले आहे.
डेब्रिज आणि मातीचे अनेक ट्रक आजही या भागात दाखल होत असल्याने या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी अभिजित कडवे, विनायक कडवे यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली आहे. दरम्यान,याबाबत तलाठी सुदर्शन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

रिसोर्ट उभारण्याचा घाट
120 एकर जागेत रिसोर्ट उभारण्याचा वासवानी यांचा मानस आहे. त्यानूसार सध्या मिळकतखार येथील खाडी किनार्‍यावर कांदळवनाची कत्तल करून रिसोर्ट उभारण्याचा घाट जिल्हा प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आदेशांना केराची टोपली
वासवानी यांच्या जागेत बंधारा बांधण्याच्या कामाबाबत तहसिलदार यांच्याकडे आरटीएस अपिल प्रलंबित असतानाही वासवानी यांच्याकडून बेकायदेयशीरपणे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाला न जुमानणार्‍या धनदांडग्यांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अनेकदा तक्रारी करुनही शासकिय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या जागेत भराव टाकल्यास नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बंद होणार असून त्यामुळे 250 ते 300 हेक्टर जमिन नापीक होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

विनय कडवे, ग्रामस्थ
Exit mobile version