| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल 3 हजार 342 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर नोंदणी केलेल्यांपैकी 674 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याची माहिती निकालानंतर समोर आली आहे. मंडळाकडून बारावीची परीक्षा 154 विषयांसाठी घेण्यात आली होती. त्यापैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात मराठी विषयासाठी राज्यभरातून 97 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी 96 हजार 709 जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी 93 हजार 367 जण उत्तीर्ण झाले असून मराठी भाषेचा एकूण निकाल 96.54 टक्के इतका आहे. या तुलनेत इंग्रजीचा 93.21 टक्के, हिंदी, उर्दूचा निकाल 94 टक्के असा आहे. इंग्रजी विषयात 23 हजार 426 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर हिंदीत 6 हजार 536 जण नापास झाले. विषयांपैकी सर्वात कमी 86.67 टक्के विद्यार्थी पाली विषयात तर त्या खालोखाल सामान्य ज्ञान , इतिहास या विभागात 87 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर संस्कृतमध्ये 99.33 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.