| मुंबई | प्रतिनिधी |
राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, मुंबईतील दहीहंडी उत्सवात तब्बल 318 गोविंदा जखमी झाले असून, 294 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 24 गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दोन गोविंदांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मनोऱ्यावरुन पडल्याने हा मृत्यू झाला असून, एका गोविंदाचा मृत्यू काविळने झाला आहे. तर, दहीहंडीसाठी रोप बांधताना तोल गेल्याने खाली पडून दुसऱ्या गोविंदाला आपला जीव गमवावा लागला. मात्र, या घटनेनं दहीहंडीच्या उत्सवावर संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे.
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहीहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मुंबईच्या पवई परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय बाल गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून काविळमुळे हा मृत्य झाल्याचे समजते.






