| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्याच्या मुदतीमधील शेवटच्या दोन दिवसांपासून अलिबागसह जिल्ह्यातील अनेक उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली. अर्ज भरण्याची लगबग प्रचंड दिसून आली. यावेळी एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. जिल्ह्यात आतापर्यंत तीनशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून गर्दी दिसून आली. तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या उमेदवारांना पाठींबा दर्शविण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा एक वेगळा जल्लोष या निमित्ताने पहावयास मिळाला.
रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि.19) 22,अर्ज दाखल करण्यात आले. 21 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने मंगळवार व बुधवारी अर्ज भरण्यासाठी अलोट गर्दी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर झाली. आपला उमेदवारी अर्ज लवकरात लवकर भरण्यात यावा, यासाठी उमेदवारांची लगबग सुरु होती. वेळ संपत आला, तरी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु होती. त्यामुळे प्रशासनाकडून उमेदवारांना टोकन नंबर देण्यात आले. नंबर कधी लागणार याकडे उमेदवारांचे डोळे लागून राहिले होते. सायंकाळी सहा वाजले, तरी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरुच होती. जिल्ह्यामध्ये मंगळवारी(दि.20) एका दिवसात दोनशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर बुधवारी(दि.21) शेवटच्या दिवशीही 150 हून अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. साधारणपणे जिल्ह्यात शेवटच्या दिवसांपर्यंत 344 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
उद्या होणार अर्जांची छाननी
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तीनशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे अर्ज स्विकारताना प्रशासनाची दमछाक उडाली. अनेकांना टोकन देण्याची वेळ प्रशासनावर आली. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी (दि.22) सकाळी अकरा ते तीन यावेळेत होणार आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच मंगळवारी(दि.27) सकाळी अकरा ते तीन यावेळेत माघार घेण्याची प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्यानंतर अंतिम उमेेदवार जाहीर केले जाणार आहेत.
बुधवारी 76 अर्ज दाखल
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची बुधवारी (दि.21) शेवटची मुदत होती. त्यामुळे त्यादिवशीदेखील अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. अर्ज भरण्यासाठी मुदत कमी असल्याचा त्रास अनेक उमेदवारांना झाला. संध्याकाळी सहा वाजून गेले तरी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरुच होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 50 अर्ज स्विकारण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित 26 अर्ज स्विकारण्यासाठी रात्री आठ वाजले. त्यामुळे अलिबागमध्ये बुधवारी 76 अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशासनाचा कारभार संथगतीने
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मंगळवारी (दि.20) सकाळपासून 89 अर्ज दाखल करण्यात आले. मात्र प्रशासनाचा कारभार संथगतीने असल्याचे दिसून आले. तासन्तास उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात उभे राहवे लागले. ज्या ठिकाणी पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्याचे कक्ष होते, त्याठिकाणी कोणतीच व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे काही उमेदवारांना अन्न पाण्याविना राहण्याची वेळ आली. उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठी विलंब लागला. त्यामुळे त्याच दिवशी उमेदवारी अर्जाची आकडेवारीदेखील जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचली नाही, त्यासाठी दुसरा दिवस उजाडला.





