करोना चाचणीचे अहवाल वेळेत न देणे, चुकीच्या क्रमांकावर देणे,असे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. पुन्हा एकदा 5 ऑगस्ट रोजी पहाटे चापर्यंत एकाच क्रमांकावर तब्बल 33 जणांच्या चाचणीचे अहवाल आल्याने संबंधितची झोप तर उडालीच, परंतु असा कारभार कधी सुधारणार हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे.
करोनाची चाचणी करायला आधीच कोणी धजावत नाही. मात्र या आजाराचा कहर वाढल्याने आता कशातरी चाचण्या वाढल्या आहेत. त्यातच ज्यांनी चाचणी केली, त्यांच्याच मोबाइल फोनवर चाचणीचा अहवाल जाणे अपेक्षित आहे. अशांना आता पूर्वीसारखा लेखी अहवाल दिला जात नाही. मोबाइलवरच हा अहवाल उपलब्ध होत आहे. चाचणी केल्याच्या ठिकाणी केवळ तोंडीच अहवाल सकारात्मक की नकारात्मक हे सांगितले जाते.
आता 3 व 4 ऑगस्ट रोजी झालेल्या चाचण्यांचे अहवाल रात्री या संदेशाद्वारे एकाच मोबाइल क्रमांकावर आल्याने यामागे नेमकी तांत्रिक की परिकर्मीकडून चुकीने एकाच क्रमांकावर सगळ्यांचे अहवाल पाठविण्यात आले, हे कळायला मार्ग नाही. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, ही तांत्रिक बाब आहे. याबाबत संबंधितांकडूनच विचारणा केल्यावर नेमका काय प्रकार घडला, हे कळेल. मात्र याबाबत चौकशी केली जाईल.
दरम्यान, याबाबत डॉ. इनायतुल्ला खान यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, बाधितांना तत्काळ फोनवरून कळवून त्याचा अहवाल दिला जातो. मात्र पूर्वी महामारीच्या काळात प्रलंबित राहिलेल्या अहवालांची पुनर्नोद सुरू आहे. त्यात कदाचित तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला असावा असे त्यांनी स्पष्ट केले.