पनवेल महापालिकेच्या तिजोरीत 333 कोटी रुपये

एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा

। पनवेल । वार्ताहर ।

मार्च अखेरपर्यंत थकीत कर भरल्यास दंड टाळता येण्यासाठी पनवेल महापालिकेतील शेकडो करदाते मालमत्ता कराचा भरणा करत असून गुरुवारी एकाच दिवशी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वांत उच्चांकी वसुली झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपत असल्याने करदाते कर भरत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 333 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. पालिकेने करवसुलीसाठी नेमलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमुळे ही वसुली प्रभावीपणे होत आहे.

पनवेल महापालिकेमध्ये साडेतीन लाख करदाते असून सिडको वसाहत क्षेत्र आणि ग्रामीण भागातून पालिकेच्या तिजोरीत 1200 कोटी रुपये थकीत मालमत्ता कर जमा होणे शिल्लक आहे. औद्याोगिक वसाहत आणि सिडकोचे रहिवास क्षेत्र यांमधून आतापर्यंत 333 कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये 124 कोटी 57 लाख रुपये खारघर वसाहतीच्या परिसरातून जमा झाल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी ठळकपणे प्रसिद्ध केली. याच खारघर वसाहतीमधील सामाजिक संस्थेने (खारघर फोरम) उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. अद्याप या याचिकेचा निर्णय लागला नसल्याने करदाते संभ्रमात आहेत. पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी करदात्यांनी कर भरावा असे आवाहन केले आहे.

आतापर्यंत 450 हून अधिक जप्तीपूर्व नोटिसा
पालिका प्रशासनाने थकीत कराच्या रकमेशिवाय पालिकेत विकास शक्य नसल्याने नागरिकांनी कर भरावा अशी भूमिका घेऊन आतापर्यंत विविध नोडमध्ये सुमारे 450 हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटिसा तसेच 16 वॉरंट नोटीसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ताधारकांना केले आहे. दरम्यान मालमत्ता कर न भरल्यास थकीत करदात्यांच्या शास्तीमध्ये दरमहा 2 टक्क्यांची वाढ होत आहे.
Exit mobile version